निलेश लंके तू किस झाड की पत्ती? तुझ्या शाळेचा मी हेडमास्तर, तुझी अशी जिरवेल की अजित पवार डोळ्यासमोर दिसेल:- उपमुख्यमंत्री अजित पवार

1 min read

पारनेर दि.११:- मला इथे आल्यानंतर कळाले की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिला जातो. नीलेश लंके ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे, माझ्या नादाला लागू नको,

माझ्या नादाला लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे, निलेश लंके तू किस झाड की पत्ती? तुझी अशी जिरवेल की अजित पवार डोळ्यासमोर दिसेल अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलेश लंके यांचा समाचार घेतला.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पारनेर येथील बाजारतळावर पवार यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

या सभेत अजित पवार यांनी थेट लंके यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मी उपलब्ध करून दिलेल्या निधीवरच नीलेश लंके विकासाच्या गप्पा मारत आहेत. कोणताही अनुभव नसताना खासदार होण्यासाठी निघालेल्यांनी आधी कामाचा अनुभव घ्यावा असा सल्ला ते अजितदादा म्हणाले,

पारनेरकरांच्या मागणीनुसारच मी निलेश लंके यांना विधानसभेला उमेदवारी दिली होती. परंतु मागणी करणारे ही या ठिकाणी उपस्थित आहेत, असा टोला पवार यांनी स्वपक्षांना लगावला.

दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही, हे खरे आहे, अशी कबुली पवार यांनी या भाषणात दिली. आचारसंहितेनंतर हे अनुदान दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मंत्री विखे म्हणाले की, ही निवडणूक तालुक्यातील दहशत आणि गुंडगिरीच्या विरोधात आहे.

या तालुक्यातील युवकांना आता रोजगार निर्माण करून देण्यासाठी आराखडा तयार केला असून, यापुढे आता एकही उद्योग कुणाच्या दादागिरीमुळे जिल्ह्यातून निघून जाणार नाही, असे आश्वासित करून, महायुतीच्या पाठीशी मतदारसंघातील सर्व जनतेने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे