कर्तव्यदक्ष व अभ्यासू अधिकारी के.डी.भुजबळ यांचं दुःखद निधन
1 min read
पुणे दि.२४:- निर्भीड व कर्तव्यदक्ष आणि प्रशासनावर पकड असणारे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ (के.डी.भुजबळ) यांचे शनिवार दि.२४ पहाटे ३.१५ वाजता दु:खद निधन झाले. दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. त्यांच्या पश्चात एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे.
पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, शनिवारी पहाटे त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि पहाटे यांची प्राणज्योत मालवली. मुळशी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी म्हणून ते काम पाहत होते.
कुणापुढे न झुकणारे, ज्यांच्याकडे कोणत्याही समस्येवर उत्तर हमखास मिळणार असे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराची प्रकरणे यांनी हाताळली होती. सीबीएसई बोर्डाच्या बोगस शाळा वरील अभ्यासपूर्ण अहवाल त्यांनी प्रशासनाकडे जमा केला होता.
प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षण विभागातील अतिशय संवेदनशील प्रकरणे हाताळत असल्यामुळे त्यांना पोलीस सुरक्षाही देण्यात आली होती. शिक्षण विभागातील सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहार ईडी कार्यालयाकडून सुरू असलेल्या चौकशी बाबत त्यांनी साक्षही दिली होती.
शिक्षण विभागाने एक अभ्यासू प्रामाणिक अधिकारी गमावला आहे. तर अनेकांचा दिलदार मित्र हरपला आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर व उपक्रमांवर भुजबळ काम करत होते. त्यामुळे शिक्षण विभागाची कधीही भरून न येणारे हानी झाली आहे.
प्रतिक्रिया
“के.डी भुजबळ हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. शिक्षण विभागातील अनेक गैरप्रकार त्यांनी उघडकीस आणले होते. शासकीय नियमावली आणि प्रशासन यांचा गाढा अभ्यास असणारा अधिकारी हरपला आहे.”
महेंद्र गणपुले
राज्य प्रवक्ते मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई