मोठी राजकीय ब्रेकिंग बातमी! राष्ट्रवादी अजित पवारांचीच; पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला:- निवडणूक आयोग
1 min readमुंबई दि.६:- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आताच लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यातं याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे.
राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय.
निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय.
प्रतिक्रिया
“निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय Sharad Pawar साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे. या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून, देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.”
जयवंत पाटील,(राष्ट्रवादी शरद पवार गट)