डुलकी लागली की हेल्मेट चा बझर वाजणार, मॉडर्नच्या नववीच्या विद्यार्थांनी बनवला भन्नाट प्रकल्प
1 min read
बेल्हे दि.३०:- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता. जुन्नर) येथील विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग तयार केले होते. त्यात नववीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला प्रयोग लक्षवेधी ठरला.
डुलकी लागली की बझर वाजणारे हेल्मेट इयत्ता नवीतल्या साईराज बांगर व विराज बांगर या विद्यार्थांनी बनवले आहे. चालकाचा डोळा लागल्याने झालेल्या अपघातांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अनेक नागरिक दुचाकीवरून रात्रीचा प्रवास करतात. या हेल्मेट मुळे चालकाने डोळे झाकल्यास लगेच अलर्ट मिळणार आहे. हे हेल्मेट दुचाकी स्वाराने घातल्यास आणि त्याला झोप आल्यानं त्याचे डोळे झाकले की हेल्मेट चा सेन्सर ऑन होऊन चालकास अलर्ट करणारे बझर ( साऊंड ) वाजेल आणि दुचकीस्वार अलर्ट होऊन वाहनावर लक्ष ठेवून व्यवस्थित वाहन चालवू शकणार आहे.
हेल्मेट बनवण्यासाठी हे वापरले साहित्य..
हेल्मेट, बटन, बजर, बॅटरी, आय आर सेन्सर, अर्डी युनो इत्यादी साहित्य वापरले असून यासाठी त्यांना १५०० रुपये खर्च आला आहे.
भविष्यात असे हेल्मेट बाजारात विकसित करून वापरात आला तर अनेक प्रवाशांचे प्राण वाचणार आहे. या प्रदर्शनात व्हर्टिकल ऑरगॅनिक शेती,अपघात नियंत्रण यंत्र, भूकंप दर्शक यंत्र, रिमोट ड्रॉन, क्यू आर कोड माहिती प्रयोग, मायक्रोस्कोप, रेल्वे प्लॅटफॉर्म मार्ग, गणिती कोडे आदी प्रयोग विद्यार्थांनी तयार केले होते.
संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळ यांनी कौतुक केले. या वेळी विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंग, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.