निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उमेदवारांकडून लाखोंचा खर्च; मतदारांची दिवाळी गोड

1 min read

आळेफाटा दि.४:- जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या रविवारी मतदान होणार असून निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (दि.३) सायंकाळी पाच वाजता थंडावल्या. तालुक्याच्या पूर्व भागातील गुंजाळवाडी, रानमळा, पिंपळवंडी, नारायणगाव, बेल्हे, वडगाव आनंद, वडगाव कांदळी या गावांसह अन्य काही गावांमध्ये ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

दिवशी व रात्री उमेदवारांकडून मतदारांना मोठ्याप्रमाणात आमिषे दाखविली जाण्याची शक्यता आहे. तसेच पैसे वाटले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. ते रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रलोभन व आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

उमेदवार यांच्याकडून यंदा हायटेक प्रचार सुरू होता. उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी देण्यावर भर देण्यात आला. अनेक उमेदवारांनी मतदारांच्या खाण्या-पिण्याची सोय केली होती. काही मतदार संघात उरलेले मतदार नाराज होऊ नये म्हणून वॉर्ड नुसार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

उमेदवारांचा प्रचार करणारे कार्यकर्ते दररोज रात्री चिकन, मटण बिर्याणी यावर ताव मारत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक जिंकून आलेल्या उमेदवाराचा कार्यकत्यांच्या जेवणावळीवर केलेला सर्व खर्च सार्थकी लागणार असून निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराकडून केला गेलेला सर्व खर्च वाया जाणार आहे.

आपण जर निवडणुकीत पराभूत झालोच तर जेवणावळीवर केलेला सर्व खर्च वसूल कसा करायचा असा प्रश्न काही उमेदवारांना पडला असून त्यामुळे निवडणुकीपूर्वीच त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. प्रचाराच्या रात्रीच्या वेळी धाबे, हॉटेल याच्यावर कार्यकत्यांची गर्दी पाहावयास मिळत होती.

दिवाळी जवळ आल्याने या निवडणुकीमुळे अनेक मतदारांची दिवाळी गोड होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकेका मताला किंमत आहे. बाहेरील मतदान कसे आणायचे याचे नियोजन केले जात आहे.

रात्रीच्या बैठका व मिटिंगा यांचा जोर वाढला आहे. पॅनल मध्येच अटीतटीची लढत होत आहे. सरपंच पदासाठी थेट मतदान होत असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे