बेल्हे ग्रामपंचायत चुरशीची; सरपंचपदासाठी चार महिला रिंगणात 

1 min read

बेल्हे दि.२९:- बेल्हे ग्रामपंचायत चुरशीची ठरत असून सरपंच पदासाठी चार महिला रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी ६ प्रभागामधून एकुण ५१ उमेदवार आपले नशिब आजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.सरपंच पदासाठी संगिता विजय घोडके, वैशाली मोहन मटाले, मनिषा डावखर व गंगूबाई सखाराम मुलमुले या चार महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बेल्हे ग्रामपंचायतीचे ६ प्रभाग असून १७ जागासाठी निवडणूक होत आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतुन होणार आहे. जवळपास ६ हजार ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून सर्व पॅनलच्या सरपंच व उमेदवारांना चिन्हाचे वाटप झाले असून बुधवार दि.२५ च्या रात्रीपासूनच प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे.

बेल्हे ग्रामपंचायत निवडणूकीत जुन्नर शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे व उपतालुका प्रमुख मोहन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कै. राजाभाऊ गुंजाळ यांच्या विचारांच्या श्रीमुक्ताई माता ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व बेल्हे शिवसेना शाखाप्रमुख राजेंद्र गफले, ठकसेन शिंदे, माजी उपसरपंच निलेश कणसे, राजेंद्र गाडगे, बाळासाहेब बांगर करत आहेत.

त्यांच्या विरुद्ध श्रीबेल्हेश्वर ग्रामविकास पॅनल व श्री भैवरनाथ, मुक्ताईमाता पॅनल लढत देत आहेत. कै. राजाभाऊ गुंजाळ यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्या माधुरी गुंजाळ यांनी श्रीमुक्ताईमाता ग्रामविकास पॅनलला पाठींबा दिल्यामुळे संगिता विजय घोडके यांचे पारडे जड झाले असून त्या सरपंचपदाच्या प्रबळ दावेदार आहेत असा सर्वसामान्य नागरिकांचा कल दिसून येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे