दिलीप वळसे पाटील महाविद्यालयामध्ये रानकवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली
1 min readनिमगावसावा दि.९ :- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगावसावा (ता.जुन्नर) येथे आज निसर्ग कवी, रानकवी, ना. धों. महानोर यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आज ना. धों. महानोर यांच्या कवितांचे वाचन करण्यात आले. ना. धों. महानोर यांच्या कवितांचे पोस्टर व त्यांच्या काही निसर्ग कविता यांचे भित्तिपत्रकात अनावरण करण्यात आले. व त्यांच्या कवितांवर आधारित काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. वसंत गावडे, डॉ. छाया तांबे, आळे येथील सुप्रसिद्ध कवी मा. संदीप वाघोले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद शिंदे, मराठी विभागातील प्रा. आशिष गाडगे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. वसंत गावडे यांनी यावेळी कवी ना. धों. महानोर यांच्या काव्य निर्मितीच्या प्रेरणा, काव्यातील प्रतिमा, प्रतीके, तसेच कवितेतील आशय विश्व उलगडून दाखवले. काव्य निर्मितीच्या शक्ती, कवितेची निर्मिती प्रक्रिया, निसर्ग कवितेची ओळख व कवी ना. धों. महानोर यांच्या समग्र साहित्याचा यावेळी धांडोळा घेतला.कवी संदीप वाघोले यांनी यावेळी काही निसर्ग कविता सादर केल्या. तसेच ना. धों. महानोर यांची चित्रपट गीते व त्यांचा भावार्थ यावेळेस स्पष्ट केला. अस्सल मातीतला कवी. शेती हे आपले विश्व मानणारा कवी म्हणून त्यांची ओळख यावेळी त्यांनी करून दिली.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव यांनी निसर्ग व मानवी जीवन यांचा समतोल साधत आकाराला आलेली ना. धों. महानोर यांची कविता तसेच त्यांच्याशी झालेली भेट, त्यांच्याशी केलेल्या मनमुराद गप्पागोष्टी, व एक पद्मश्री व्यक्तीचे जीवन या गोष्टींना उजाळा दिला. याप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनीही काव्यवाचन केले.मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी आजवरची मराठी निसर्ग कविता व त्यातील ना. धों. महानोर यांचे स्थान अधोरेखित केले. आपल्या प्रतिमा व प्रतिभा यांच्या जोरावर इतर निसर्ग कवींपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध करणारा कवी. अस्सल मातीचा गंध असणारा कवी. निसर्गाचे वर्णन करण्यापेक्षा निसर्गात जगणारा कवी. व त्यांचा जीवनपट या वेळी स्पष्ट केला.