शैलजा दराडेंना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; शिक्षक,आरटीओ,तलाठी पदभरतीत ४४ तरुणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक
1 min readपुणे, दि. ९:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन प्रभारी आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे या शिक्षण क्षेत्रातील आहेत. त्यांनी टीईटी पास करण्याचे अमिष दाखवून फसवणूक केलीच आहे. मात्र, त्याचबरोबर आरटीओ, तलाठी या पदावर नोकरी लावण्याच्या अमिषानेही काही जणांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सी. सी. थोरबोले यांनी दिली. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, ४४ जणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शैलजा यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी दिला. शैलजा दराडे यांच्यासह त्यांचा ‘भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोपट सुखदेव सूर्यवंशी (वय ५०, रा. खाणजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांना मंगळवार (दि.८) न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करून उमेदवारांना नोकरीस लावण्याच्या अमिषाने फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांची आणि आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम अद्याप हस्तगत करण्यात आलेले नाही. रकमेची कोठे विल्हेवाट लावली याचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील अंजली नवगिरे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने कोठडी सुनावली. दरम्यान गुन्ह्यातील फिर्यादी, साक्षीदार व आरोपी यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी सायबर तज्ज्ञांमार्फत ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
‘त्या’ व्यक्तीचा तपास सुरू
नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात आणि शैलजा आणि त्यांच्या भावाला मदत करणाऱ्या एका आरोपीचे नाव पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.