जावयाला धोंडे जेवण पडले १४ लाखांना

1 min read

पुणे, दि. ६ – धोंडे जेवण एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून तब्बल ३० तोळे सोन्याचे दागिणे, चांदी आणि २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा १४ लाख ५८ बंगल्यातून हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना संदेश सोसायटी सरस्वती बंगला मार्केटयार्ड, पुणे परिसरात घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी माहेन गाडगीळ (वय ६७) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गाडगीळ हे व्यावसायिक आहे.पूर्वी त्यांचा दुधाचा व्यवसाय होता.

गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी असे दोघेजण बंगल्यात राहतात. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ते सोमवार पेठेतील आपल्या नातेवाईकांच्या घरी धोंडे जेवणासाठी गेले होते. त्यामुळे बंगला कुलूप लावून बंद होता.

चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून घरातील रोकड, सोने-चांदीचे दागिणे, असा १४ लाख ५८ हजारांचा ऐवज चोरी केला. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास गाडगीळ दाम्पत्य घरी परतले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे