धान्याचा काळाबाजार करणाऱ्या शिंदेवाडीतील रेशन दुकानाचा परवाना रद्द

1 min read

बेल्हे दि.४:- शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील रेशन दुकानातील गैरव्यवहार प्रकरणी गावातील नागरिक निलेश भागवत शिंदे यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.पुरवठा विभागाने तपास केला असता धान्याचा गैव्यवहार झाल्याच उघड झाल्याने काल दि.३ ऑगस्ट रोजी स्वस्त धान्य दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.सीमा होळकर यांनी दिला आहे.तक्रारीच्या अनुषंगाने तालुका पुरवठा अधिकारी यांनी सदर दुकानाची ३१ जानेवारी २०२३ रोजी तपासणी केली असता, तपासणीमध्ये ५ हजार ९६० किलो तांदूळ, १७८२ किलो गहू कमी आढळला होता आणि चार किलो साखर जास्त आढळली होती तसेच दुकानदार सर्व ग्राहकांना पावत्या देत नाही अशी तक्रार होती. वरील दोषांच्या अनुषंगाने सदर रेशन दुकानदार मारुती शंकर शिंदे, तक्रारदार निलेश भागवत शिंदे तसेच तालुका पुरवठा अधिकारी रवींद्र दळवी यांची ११ एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यापुढे सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कमी आढळलेल्या ५९६० किलो तांदूळ, १७८२ किलो गहू आणि चार किलो साखर जास्त आढळल्याबद्दल सदर रेशन दुकानदाने केलेला खुलासा योग्य आढळून आला नाही. तसेच घडलेला दोष हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आणि धान्याबाबत अपहार झाल्याचे दिसून आल्याने सदर दोषास स्वस्त धान्य दुकानदाराला पूर्णपणे जबाबदार धरून जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी स्वस्त धान्य दुकान परवानाधारक मारुती शंकर शिंदे यांच्याकडून तपासणी मध्ये कमी आढळून आलेला. १७८२ किलो गहू व ५९६० किलो तांदूळ धान्याची चालू बाजार भावाप्रमाणे रक्कम शासन जमा करून घेण्याचा तसेच त्यांच्या स्वस्त धान्य दुकान परवान्याची १००% अनामत रक्कम जप्त करण्याचा आणि स्वस्त धान्य दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०२३ रोजी दिला आहे.त्यामुळे एकविसाव्या शतकात, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आणि रेशनचा सर्व कारभार ऑनलाईन होऊनही कशा पद्धतीने काळाबाजार करून गोरगरिबांना मिळणाऱ्या रेशन धान्याचा अपहार केला जातो हे उघड झाले आहे.परंतु अजूनही पाच टन धान्याचा आणि दहा हजार लिटर रॉकेलचा घोटाळा सिद्ध न झाल्याने आम्ही पुरवठा शाखा उपायुक्त, विभागीय कार्यालय, पुणे यांच्याकडे पुढील अपील दाखल करणार आहोत, असे तक्रारदार प्रदीप पांडुरंग शिंदे व निलेश भागवत शिंदे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे