ऑपरेशन वेळी डॉक्टरांनी उजव्या ऐवजी कापला डावा पाय; रुग्ण दोन्ही पायाने अधू; खासगी डॉक्टरचा प्रताप

1 min read

नाशिक, दि. ४:- खासगी डॉक्टर रुग्णांच्या जिवाशी कसा खेळ करतात हे पुन्हा एकदा नाशिकमध्ये समोर आले आहे. एका ५९ वर्षीय रुग्णाच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी चक्क त्यांचा डावा पाय कापण्यात आला आणि यामुळे संबंधित रुग्ण दोन्ही पायाने अधू झाले आहेत. याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर गुन्हाही दाखल झाला आहे.

मात्र, हा गुन्हा दाखल करताना आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याकडून खूप त्रास दिला गेल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. नाशिकच्या जेलरोडवरील दसक भागात राहणारे सुभाष खेलूकर, वय ५९ वर्षे. इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ते सीनियर फिटर या पदावर काम करतात.

२०१४ साली त्यांचा दुचाकीवर एक अपघात झाल्याने त्यांच्या उजव्या पायात रॉड टाकण्यात आला होता. मात्र, तो रॉड चालताना दुखत असल्याने तो रॉड काढून टाकण्यासाठी २० मे २०२३ ला नाशिकरोड परिसरातील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले.

हॉस्पिटलमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विपुल काळे यांनी उजव्या पायाचा एक्स रे काढण्यास सांगितले. तसेच ब्लड, युरीन टेस्ट, इ.सी.जी., सोनोग्राफी अशा सर्व टेस्ट करायला सांगितल्या. त्या सर्व टेस्ट करून रिपोर्ट डॉक्टरांकडे सादर करताच डॉक्टरांच्या सांगण्यानुसार २६ मे रोजी खेलूकर अॅडमिट झाले व २७ तारखेला ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांना नेण्यात आले.

बाहेर आल्यानंतर त्यांच्या डाव्या पायावर पाच टाके असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांनी मात्र डाव्या गुडघ्यावर ब्लेड पडल्यामुळे दोन टाके पडले असे सांगितले.

मात्र, काही दिवसांनंतर सुभाष यांना उजव्या बरोबर डाव्या पायानेही चालता येत नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरवर आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे