ओतूरच्या शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या एआय अँड एमएल विभागाच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय आयडियाथॉनमध्ये यश

1 min read

ओतूर दि.२७:- शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, ओतूर येथील एआय अँड एमएल विभागाने पुन्हा एकदा आपल्या नाविन्यपूर्ण विचारसरणीची आणि तांत्रिक कौशल्याची छाप राज्यस्तरावर उमटवली आहे. विभागातील विद्यार्थी समर्थ जाधव यानी “टेकटॉनिक पिचक्राफ्ट आयडियाथॉन २०२६” या राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ही स्पर्धा सोमवार दि. १८ व मंगळवार १९ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सीएसएमएसएस छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पार पडली.या प्रतिष्ठित स्पर्धेत राज्यभरातील ३० संघांनी सहभाग नोंदवला होता. समर्थ जाधव यानी “ॲक्सेस लर्न” (AccessLearn) हा अभिनव प्रोजेक्ट सादर करत आपल्या कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक भान यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणला.त्यांच्या प्रकल्पाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली आणि त्यांना द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला. तसेच, समर्थ जाधव आणि अनिकेत इगडे या विदयार्थ्यांनी याच स्पर्धेमध्ये “न्यूरल केअर एआय” (NeuralCare AI) या दुसऱ्या प्रोजेक्टद्वारेही सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची छाप पाडली.“ॲक्सेस लर्न” आणि “न्यूरल केअर एआय” हे प्रकल्प शिक्षण अधिक सुलभ, सर्वसमावेशक व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले असून, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची क्षमता, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि उत्कृष्ट तांत्रिक प्रावीण्य यांच्या माध्यमातून या प्रकल्पांनी स्पर्धेत विशेष ठसा उमटवला. या प्रोजेक्ट चा विद्यार्थी व शिक्षक याना पुढील काळात अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.या उल्लेखनीय यशामुळे एआय अँड एमएल विभागासह संपूर्ण महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनत, दूरदृष्टी, जिद्द आणि नवकल्पनांप्रती असलेली आवड यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. विशाल तांबे, मानद सचिव मा. वैभव तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. यू. खरात, कॉम्पुटर विभागप्रमुख डॉ. सुनील खताळ, एआय अँड एमएल विभागप्रमुख डॉ. पूजा घोलप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. सचिन जाधव तसेच ई&टीसी विभागप्रमुख प्रा. नीता बानखेले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!