साखरपुड्याला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; १३ जणांचा मृत्यू? २० ते २५ जण गंभीर जखमी
1 min read
पालघर दि.१८:- पालघरमध्ये साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरने धडक दिली. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालघरच्या धानीवरी येथून वऱ्हाडाचा ट्रक साखरपुड्याला जात होता. त्याचवेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिली. वऱ्हाडाच्या ट्रकमधून ८० पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. या अपघातानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे लग्न घरावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.

या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे साखरपुड्याच्या घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

