बेल्हे येथील मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन चोरी करणारा जेरबंद; लाल बुटाच्या धाग्याने आळेफाटा पोलिसांनी उकलला गुन्हा

1 min read

बेल्हे दि.१७:- बेल्हे (ता.जुन्नर) मुक्ताबाई माता मंदिरात मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी चोरी करून पसार झालेल्या परजिल्ह्यातील सराईत टोळीला आळेफाटा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मंदिर चोरीपासून साऊंड सिस्टिम, डीजे साहित्य आणि एलईडी टीव्ही चोरीपर्यंतच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी तब्बल ३ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रात्रीच्या अंधारात त्या खिडकीतून मंदिरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी आधी देवीचे दर्शन घेतले, देवीच्या पाया पडले आणि त्यानंतरच देवीच्या गळ्यातील बेन्टेक्सचे मंगळसूत्र चोरून नेले. विशेष म्हणजे,चोरीच्या वेळी आरोपीच्या पायात असलेल्या लाल रंगाच्या शूजचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आणि त्याच आधारे तपासाची दिशा निश्चित झाली.आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव त्यांनी गुन्हे शोध पथकाला कसून तपासाच्या सूचना दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले.या प्रकरणाची सुरुवात निमसेमळा-संतवाडी येथील विजय शरद फापाळे यांच्या टाटा ७०९ टेम्पोमधून ब्रिटीश कंपनीचे दोन एम्प्लिफायर चोरीला गेल्यानंतर झाली होती. या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान पोलिसांनी तुकाराम पोपट कातोरे (रा.जांबुत बु.,ता.संगमनेर) निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ आणि अजय किसन मेंगाळ (दोघे रा.जांबुत बु., ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींनी बेल्हे येथील मुक्ताबाई मंदिरातील चोरीची कबुली दिली. आळेफाटा, ओतूर आणि घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील इतर चोरीचे गुन्हेदेखील उघडकीस आले. या टोळीकडून ब्रिटीश कंपनीचे दोन एम्प्लिफायर, एनएक्स ऑडिओ आरएक्स मशिन,एन लॅब एक्स एम्प्लिफायर,पिंटो स्पीच प्लेअर,फोर चॅनल मिक्सर,डीबीएक्स क्रॉस ओव्हर,पायनर कंपनीचे सीडीजे प्लेयर,एलईडी टीव्ही,देवीचे मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!