भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड बनला “या” संघाचा मालक
1 min read
लंडन दि.१२:- सध्याच्या घडीला सगळीकडे फ्रँचायझी लीगचं प्रस्थ आहे. जगभरात बऱ्याच ठिकाणी या टी-२० लीग खेळल्या जातात. याच पार्श्वभूमीवर युरोपमध्ये एक नवीन लीग सुरू होणार असून, त्यात भारतीय क्रिकेटच्या महान दिग्गजांपैकी एक असलेल्या राहुल द्रविड यांचा संघ असेल.
भारताचे माजी कर्णधार, प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड या लीगमध्ये संघाचे मालक म्हणून दिसणार आहेत.युरोपियन टी२० प्रीमियर लीग फ्रँचायझी ‘डब्लिन गार्डियन्स’चा मालक म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे. युरोपियन टी-२० प्रीमियर लीगने (ETPL) ११ मे रोजी द्रविड यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
यासह, २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या या नवीन लीगसाठीच्या सर्व सहा फ्रँचायझींची रचना पूर्ण झाली आहे. डब्लिनमध्ये आयोजित एका भव्य समारंभात राहुल द्रविड यांना डब्लिन फ्रँचायझीचा मालक म्हणून घोषित करण्यात आलं.या कार्यक्रमाला क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती लाभली.
ईटीपीएलचे सह-संस्थापक अभिषेक बच्चन यांच्यासह ख्रिस गेल, जॉन्टी ऱ्होड्स, ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ डु प्लेसिस यांसारखे दिग्गजही या लीगशी संबंधित आहेत.
