कुत्र्याच्या हल्यात बिबट्याचे पिल्लू ठार 

1 min read

बेल्हे दि.१०:- बिबट्याच्या पिल्लांवर कुत्र्यांनी हल्ला करून एक पिल्लू मृत तर दुसरे जखमी झाले आहे. जुन्नर तालुक्यातील आणे पठार परिसरात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणे (ता.जुन्नर) येथील रहिवासी महेश भिमाजी थोरात यांच्या गोठ्याजवळ गस्त घालत असताना बिबट्याची दोन पिल्ले पाळीव कुत्र्यांच्या तावडीत सापडली.

या हल्ल्यात एका बिबट्याच्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या पिल्लाला स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाला तात्काळ कळविण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पिल्लांना ताब्यात घेत.

जखमी झालेल्या पिल्लाला माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली. स्थानिक नागरिकांनी सुरक्षितरीत्या वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना उपतालुका प्रमुख अभिषेक गवळी यांच्यासह महेश भाऊ थोरात, भिमाजी थोरात, संतोष गोफणे, संतोष थोरात, नितीन शेळके, प्रवीण कांबळे, कसम चौघुले आणि गणेश शिरतार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

दरम्यान, आणे पठार परिसरात वारंवार बिबट्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!