मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन; आता हा प्रकल्प मिसिंग लिंक नाही तर कनेक्टिंग लिंक:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

पुणे दि.२:- मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी या नवीन मार्गावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत प्रवासाचा आनंद लुटला. आता हा प्रकल्प मिसिंग लिंक नसून, कनेक्टिंग लिंक आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर एक खास दृश्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीत स्वार झाले होते. विशेष म्हणजे, या नव्याकोऱ्या ‘मिसिंग लिंक’वर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करत हा मार्ग प्रवासासाठी खुला केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या कामाची आणि बोगद्यांमधील अद्ययावत यंत्रणेची पाहणीही केली.

लोकार्पणाआधीच या प्रकल्पातील बोगद्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तब्बल 23.5 मीटर रुंदीच्या या बोगद्याला जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बोगद्याची नोंद झाली आहे. या सोहळ्यात याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं.

आज झालेल्या या लोकार्पणानंतर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासातील वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. घाटातील अवघड वळणे आणि चढ-उतार टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

हा प्रकल्प २०१९ मध्ये सुरू झाला होता आणि आज तो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या प्रकल्पात टायगर व्हॅलीवर उभारलेला भव्य केबल-स्टेड पूल आणि जगातील सर्वात रुंद बोगदे हे अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहेत. या नवीन मार्गामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर इंधनाचीही मोठी बचत होऊन दळणवळणाला गती मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!