व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक समुपदेशन सत्राचा अभिनव उपक्रम

1 min read

वडगाव कांदळी दि.२:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, कांदळी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक असा पालक समुपदेशन उपक्रम उत्साहात आणि प्रभावीपणे राबविण्यात आला. शुक्रवार दि.२४ एप्रिल तसेच सोमवार, दि. २७ एप्रिल रोजी इयत्ता १ ली ते १० वी अशा विविध इयत्तांनुसार आयोजित करण्यात आलेल्या या सत्रांनी पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद अधिक दृढ केला.

या समुपदेशन सत्राचे मार्गदर्शन शाळेच्या अनुभवी समुपदेशिका वर्षा गांधी यांनी केले. त्यांनी पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले.

या सत्रामध्ये विशेषतः खालील विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. आरोग्य व स्वच्छता, आहार व पोषण सवयी, मुलांच्या वर्तनातील बदल, शैक्षणिक प्रगती व अध्ययन सहाय्य. गांधी यांनी उदाहरणे, अनुभव आणि संवादात्मक पद्धतींच्या माध्यमातून पालकांना मुलांच्या बदलत्या वर्तनाचे आकलन कसे करावे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य प्रतिसाद कसा द्यावा, तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी घरातून कोणते पूरक प्रयत्न करता येतील, याविषयी उपयुक्त मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या मानसिक जडण – घडणीबद्दल अधिक संवेदनशीलतेने विचार करण्याची दिशा मिळाली, तसेच मुलांच्या सवयी, अभ्यासातील अडथळे आणि भावनिक गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास मदत झाली. शाळा व पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास या सत्राचा मोठा फायदा झाला.

शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग किती आवश्यक आहे, हे स्पष्ट केले. समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांच्या कुशल नियोजनामुळे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सन्माननीय सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याबद्दल शाळेतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!