मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

1 min read

बीड दि.२९:- बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्याचे समोर आले आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि सरपंचपद पोटनिवडणुकीच्या उमेदवार अश्विनी देशमुख यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत सदस्य स्वरुपानंद देशमुख पोटनिवडणुकी विजयी झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या पत्नीचा ९२ मतांनी पराभव झाला आहे.मस्साजोगच्या गावकऱ्यांनी विरोधात कौल दिल्याने सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मंगळवारी झालेल्या मतदानात एकूण 2080 मतदारांपैकी 1744 जणांनीनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानुसार एकूण 84 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर आज होत असलेल्या मतमोजणीनंतर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे स्थानिकांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं. खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीयांनी व्यक्त केली होती, परंतु मागच्या वेळी अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेल्या स्वरुपानंद देशमुख यांनी यावेळी आपला अर्ज कायम ठेवल्याने पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते.मस्साजोग येथे नेहमीच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचं सांगण्यात येतं. मंगळवारीही मतदान प्रक्रिया शांततेतच पार पडेल असं वाटत होतं, परंतु मतदान केंद्राबाहेर दोन गट आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे 44 वर्षीय तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी त्यांचा निर्दयीपणे छळ करण्यात आला, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. त्यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्याविरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी लढत मस्साजोगमध्ये झाली. मतदानावेळी गावात आणि मतदान केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!