मंत्रिमंडळ बैठकीत १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी

1 min read

मुंबई दि.२९:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक मंत्रालयात घेतली. मुंबई मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा -१ आणि टप्पा -२ अशा एकूण १८,१३०.५५ कोटी रुपयांच्या कामांना त्यांनी मंजुरी दिली. नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या कामांच्या भूसंपादनासाठी लागणारे कर्ज हुडकोकडून घेण्यास तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी टप्पा-२ मधील १०६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावालाही यावेळी त्यांनी मंजुरी दिली.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता आदी उपस्थित होते.१९ स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रो मार्गिकेची लांबी ३४.२१ किमी आहे. टप्पा १ कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा २ धामणकर नाका ते दुर्गाडी, मार्गिका ५अ दुर्गाडी – कल्याण – उल्हासनगर या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे ६९ लाख नागरिकांना याचा लाभ होणार असून प्रवास वेळेत ४०-५०% बचत होईल.नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गाची लांबी १६२.५७७ कि.मी. असून, प्रकल्पाची अंदाजित किंमत १९,५८२.१९ कोटी रुपये आहे. याच्या भूसंपादनासाठी ३,१६२.१८ कोटी रुपयांच्या खर्चास, भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्गाची लांबी ९४.२४१ कि.मी. असून भूसंपादनासाठी ९३१.१५ कोटी रूपये, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्गाची लांबी २०४.७९९ कि.मी. असून याच्या भूसंपादनासाठी २,३५३.९४ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली. विदर्भातील दळणवळण आणि उद्योगांना चालना देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सहा वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत. भाविकांसाठी वाहनतळ, पाणी पुरवठा, विद्युतविभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मुख्य नियंत्रण कक्ष यासाठी १०६३ कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली असून ही कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!