तीव्र पांढऱ्या LED हेडलाईट्समुळे अपघातांचा धोका वाढला; मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ कारवाईची मागणी

1 min read

बेल्हे दि.१८:- सध्या रस्त्यावर अनेक वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलेल्या तीव्र पांढऱ्या (White LED) हेडलाईट्समुळे वाहनचालकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिशय तेजस्वी हेडलाईट्स मुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता स्पष्टपणे दिसत नसून, अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.रात्री वाहन चालवताना डोळ्यांवर ताण येणे, समोरच्या वाहनाचा अंदाज न लागणे, तसेच काही क्षणांसाठी दृष्टी मंदावणे अशा समस्या वारंवार उद्भवत आहेत. विशेषतः ग्रामीण भाग आणि राष्ट्रीय महामार्गांवर ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे.अनेक वाहनधारकांकडून मानकांपेक्षा जास्त प्रकाश देणारे व नियमबाह्य LED बल्ब वापरले जात असून, हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांनी तात्काळ कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील सामाजिक कार्यकर्ते राजू भोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात खालील उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे: नियमबाह्य पांढऱ्या LED हेडलाईट्स वर तात्काळ बंदी व कारवाई वाहनांची नियमित तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समाजसेवक राजू भोर यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!