उस लागवडीचा आदर्श उपक्रम; प्रगतशील शेतकरी संदीप जाधव यांचा पुढाकार
1 min read
पिंपरी कावळ दि.१८:- जुन्नर तालुक्यातील पिंपरी कावळ या गावचे प्रगतशील शेतकरी संदीप जाधव व किरण जाधव यांनी आधुनिक पद्धतीने उसाची लागवड करून आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये ८६०३२ या सुधारित उस वाणाची लागवड केली आहे.
गहू पिकाची काढणी झाल्यानंतर योग्य मशागत करून शेत तयार करण्यात आले व त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने उसाची लागवड करण्यात आली. या लागवडीसाठी ९००० उसाची रोपे वापरण्यात आली. प्रति रोप किंमत सुमारे २ रुपये ५० पैसे असल्याने एकूण रोपांवर अंदाजे, २२५०० रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.
तसेच दोन रोपांमधील अंतर सव्वा फूट ठेवून लागवड करण्यात आली आहे. योग्य अंतर, पाणी व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ही लागवड अधिक उत्पादनक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जाधव दांपत्याने शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
त्यांच्या या प्रयत्नामुळे परिसरातील इतर शेतकरीही आधुनिक शेतीकडे वळण्यास प्रोत्साहित होत आहेत.या उपक्रमातून शेतीत नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य संगम केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
———-
चौकट
सलग तिसऱ्या वर्षी ऊसाची शेती करत आहेत. गेल्या वर्षी दीड एकर क्षेत्रात १०० टन उसाचे उत्पादन घेतले. त्यातून त्यांना उत्पादन खर्च जाऊन २ लाख ५० हजार रुपये नफा झाला. याच धरतीवर त्यांनी पुन्हा उसाची लागवड केली आहे.
———-
प्रतिक्रिया
बाजारभावा अभावी शेतकऱ्याचे सध्या वाईट दिवस आहेत. उसाचे हमीभाव देणारे पीक आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवड करून कांदा व इतर पिकांमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळावे.
संदीप जाधव, ऊस उत्पादक शेतकरी
———-
“इतर पिकांचे सतत पडणारे बाजारभाव आणि शेतीत गुंतवलेले भांडवलही निघत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. या तुलनेत ऊसाला मिळणारा चांगला एफआरपी (किमान हमीभाव), कमी भांडवल व श्रम, तसेच हमखास नफा मिळवून देणारे पीक म्हणजे ऊस होय. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे वळावे,”
विकास चव्हाण,
तज्ञ संचालक श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना
———–
