पिंपळवंडीत श्री मळगंगा माता यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
1 min read
पिंपळवंडी दि.१३:- पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री मळगंगा माता यात्रा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. तीन दिवस चाललेल्या या यात्रा उत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन आपली श्रद्धा व्यक्त केली.
यात्रेची सुरुवात शुक्रवारपासून पारंपरिक आणि आकर्षक कार्यक्रमांनी झाली. सायंकाळी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. त्यानंतर चोळी-पातळ परिधान केलेल्या महिलांची भव्य मिरवणूक, मळगंगा माता लेझीम पथकाचे सादरीकरण यामुळे वातावरण भक्तीमय झाले.
रात्री पैठणी साडीचा लकी ड्रॉ काढण्यात आला असून, हजारो महिलांनी त्यात उत्साहाने सहभाग घेतला. याच निमित्ताने रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शनिवार दिनांक ११ रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
देवीचा अभिषेक विधी पार पडला. सकाळी मांडव-डहाळे कार्यक्रमानंतर पुन्हा बैलगाडा शर्यतींना सुरुवात झाली. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली होती.सायंकाळी शेरणी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यामुळे यात्रेला सांस्कृतिक रंगत मिळाली.यात्रेची सांगता निकाली कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने करण्यात आली. या आखाड्यात नामांकित पैलवानांनी दमदार झुंजी देत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या कुस्त्यांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळली होती आणि यात्रेचा समारोप अत्यंत जल्लोषात पार पडला.
संपूर्ण यात्रा उत्सवात कोणतीही अनुचित घटना न घडता, अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडले. ग्रामस्थ, यात्रा कमिटी, स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वी रीत्या संपन्न झाला.या यात्रेमुळे पिंपळवंडी परिसरात भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे सुंदर दर्शन घडले.
