आळे येथे ‘श्री रेडा महाराज वार्षिक यात्रा महोत्सवा’चा रविवार पासून थाटात प्रारंभ

आळे दि.१०: जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र आळे (संतवाडी, कोळवाडी) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘श्री रेडा महाराज वार्षिक यात्रा महोत्सव’ येत्या रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बुधवार दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आणि वेळापत्रक:यात्रा महोत्सवाचे नियोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले असून, चारही दिवस विविध विधी संपन्न होतील: रविवार, १२ एप्रिल: महोत्सवाची सुरुवात ‘श्रीं’च्या अभिषेकाने होईल. दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार, १३ एप्रिल: पहाटे ५ वाजता जुन्नरचे तहसीलदार डॉ. बाळासाहेब सिरसाट यांच्या हस्ते ‘शासकीय महापूजा’ पार पडेल. दुपारी पालखी सोहळा आणि रात्री ८ वाजता ह.भ.प. गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होईल. मंगळवार, १४ एप्रिल: सकाळी ७ ते ९ या वेळेत महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात येईल. दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा भव्य हंगामाही रंगणार आहे. रात्री ८ वाजता ह.भ.प. विशाल महाराज हाडवळे यांचे हरीकीर्तन संपन्न होईल.बुधवार, १५ एप्रिल: महोत्सवाच्या सांगता दिनी सकाळी १० वाजता ह.भ.प. सुदाम महाराज बनकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी १ वाजता महाप्रसाद आणि सायंकाळी ५ वाजता ‘पाऊलघडी’ कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल.
भक्तीचा महाकुंभ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले, त्या श्री रेडा महाराजांच्या समाधी मंदिराचा हा वार्षिक सोहळा संपूर्ण जुन्नर तालुक्यात आकर्षणाचे केंद्र असतो.या काळात श्रीक्षेत्र आळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीने भाविकांसाठी चोख व्यवस्था केली आहे.“सर्व भाविकांनी या चार दिवसीय भक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट (संस्था) आणि समस्त ग्रामस्थ आळे, संतवाडी व कोळवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!