भोंदू अशोक खरात पुणे कनेक्शन; पुण्यातील ५ बिल्डरांकडून कोट्यवधींचा व्यवहार; ‘एसआयटी’कडून बिल्डरांचा शोध
1 min read
नाशिक दि.८:- भोंदूबाबा अशोक खरात याने नाशिकमधील ३ आणि पुण्यातील ५ बिल्डर्ससोबत सुमारे १ हजार कोटी रूपयांचा व्यवहार केला आहे. या व्यवहारांमध्ये नाशिक व पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील मोक्याच्या जमिनींच्या व्यवहारांचा समावेश आहे. यात खरातने कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘एसआयटी’च्या पथकाने सोमवारी (दि.६) दिवसभरात पुण्यात ५ बिल्डर्ससह खरातच्या पत्नीचा शोध घेतला. अशोक खरात याचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. त्याची दुसऱ्या गुन्ह्यातील सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत ८ एप्रिल रोजी संपत असल्याने ‘एसआयटी’कडून वेगाने तपास सुरू आहे.
‘एसआयटी’ मधील पाच पोलीस अधिकारी सोमवारी (दि.६) पुणे शहरात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात व आर्थिक व्यवहारांशी संबंधित पाच बिल्डर्सचा शोध घेत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. खरात कोट्यवधी रूपये हवाला रॅकेटमध्ये गुंतवणूक करत होता.खरातने जमिनी व्यवहारात केलेली गुंतवणूक चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.
अशोक खरात याने नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. खरातचे १० कोटींचे फार्महाऊस, नाशिक शहरात १ कोटींचे ऑफिस आणि ५ कोटींचा बंगला असून,
त्याने नाशिक व अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींचे बाजारमूल्य असलेल्या जमिनी खरेदी केल्याचेही समोर आले आहे. या जमीन खरेदी प्रकरणात महसूल विभागातील अनेक अधिकारी खरातला मदत करत असल्याचा संशय आहे.
असा करायचा जमीन खरेदी
ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, अशा लोकांना हाताशी धरून खरात स्वतःची काही रक्कम टाकून जमिनी खरेदी करत होता. या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा त्याचा उद्योग होता, असा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
खरातला जमीन खरेदी प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी मदत होते. खरातने बिल्डर्ससोबत कोट्यवधी रूपयांचा व्यवहार केल्याचा दाट संशयही एसआयटी पथकाला आहे.
भोंदू खरातमुळे संपवले आयुष्य
भोंदू खरातचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे. यामुळे पुर्वी खरातच्या दहशतीमुळे घाबरून पुढे न येणारे लोक आता पुढे येवू लागले आहेत. ९ जून २०२२ रोजी शिर्डीतील तरूण विकास दिवटे याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
धक्कादायक बाब म्हणजे विकासने मृत्यूपूर्वी लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये अशोक खरातच्या नावाचा उल्लेख केला होता. तरीही, तत्कालीन पोलिसांनी खरातला क्लीनचीट देत दोषारोप पत्रातून वगळले. त्यामुळे आता तरी न्याय मिळणार का? असा सवाल त्यांचे बंधू राजेंद्र दिवटे यांनी केला आहे.
विकास दिवटे याच्या आत्हत्येमागे कौटुंबिक छळ आणि भोंदू खरातची धमकी हे मुख्य कारण असल्याचा आरोप त्यांचे बंधू राजेंद्र दिवटे यांनी केला आहे. पती पत्नीच्या कौटूंबिक वादात सासरच्या मंडळींनी खरातला मध्यस्थी घेतले. खरातने विकासला साई संस्थानमधील नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती.
आर्थिक देवाणघेवाण आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून विकासने टाकाचे पाऊल उचलले. पंचनाम्यावेळी विकासच्या मोबाईलच्या मागे एक चिठ्ठी सापडली होती. ज्यात त्याने आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांची नावे लिहिली होती त्यात खरातचे नावही लिहिले आहे. कायद्यानूसार मृत्यूपूर्व जबाब किंवा सुसाईड नोट हा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
