तुला दहा हजार रुपये देतो, तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, अधिकार्याच्या मागणीने पोलीस दलात खळबळ

1 min read

अकोला दि.२:-पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना अकोल्यातून समोर आली आहे. तुला दहा हजार रुपये देतो, तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव,अशी मागणी एका पोलिस अधिकार्याने तुरूंगातील आरोपी महिलेकडे केल्याचा आरोप आहे. हा प्रकार समोर येताच पोलिस दलात खळबळ उडाली असून संबंधित पोलीस अधिकारी राजेश जाधव याला तडका फडकी निलंबित करण्यात आलं आहे.80 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सायबर पोलिसांनी पालघर येथून दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे. अटक झालेली महिला बुधवारी लॉकअपमध्ये असताना तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस अधिकारी राजेश जाधव याने महिलेला तिच्या मुलीचे वय विचारले. यावर महिलेने 27 वर्षे आहे, असे सांगितले. यानंतर ‘दहा हजार रुपये देतो, एका रात्रीसाठी पाठव,’ याशिवाय, गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी मदत करतो, असा प्रस्ताव दिल्याचा महिलेचा दावा आहे.हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांची याची दखल घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राजेश जाधव याला चांगलीच फटकार लावली. ‘वर्दी घातली आहेस ना तू… असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का?’ असे खडे बोल राजेश जाधव या पोलिस अधिकार्याला सुनावले, याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणार्या या कृत्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव याला तडका फडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिकार्यांच्या अनुसार, पोलीस निरीक्षक राजेश जाधव विरोधात स्वतंत्र फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी मोठा दावा केला आहे. राजेश जाधवच्या संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्यात. मात्र, तक्रार न झाल्यानेच त्याची हिम्मत वाढली. दहा वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीच्या संदर्भातील तक्रार आपल्याकडे आली होती असं, डॉ. आशा मिरगे म्हणाल्या.या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली असून पोलीस ठाण्यातच महिला सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून पाहायला मिळत आहे. असे प्रकार होऊ नये म्हणून अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!