रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘महिला आयोगाला लागलेली कीड गेली!’
1 min read
नाशिक दि.२१:- नाशिक येथील कथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. या मोठ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी
चाकणकर यांच्यावर अत्यंत घणाघाती आणि कठोर शब्दांत टीका केली असून, राजीनाम्यामुळे एकप्रकारे महिला आयोगाच्या पदाला लागलेली कीड दूर झाली असल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.रुपाली ठोंबरे-पाटील यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, ज्यांना इतक्या महत्त्वाच्या पदावर बसवले जाते,
त्यांनी जर सर्वसामान्यांची मदत करण्याचे आणि न्याय देण्याचे आपले कर्तव्य योग्यरीत्या बजावले नाही, तर त्यांनी राजीनामा देणेच क्रमप्राप्त ठरते. चाकणकर या अत्यंत महत्त्वाच्या अशा संविधानिक पदावर राहूनही गुन्हेगारी कटात सहभागी होत होत्या आणि गुन्हेगारांना अभय देत होत्या,
असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. त्यामुळेच महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या वतीने सुनेत्रा वहिनींकडे या राजीनाम्याची आग्रही मागणी केली होती आणि महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी याची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन हा राजीनामा घेतला आहे, असेही ठोंबरे म्हणाल्या.
यापूर्वी घडलेल्या संपदा मुंडे प्रकरणातही चाकणकर यांनी महिलांची बदनामी होईल असे चुकीचे वक्तव्य केले होते. त्यावेळी आपण स्वतः अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी चाकणकर यांना सक्त समज दिली होती, अशी जुनी आठवणही ठोंबरे यांनी उघड केली.
आता या नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात केवळ राजीनामा पुरेसा नसून रुपाली चाकणकर यांना थेट सह आरोपी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सखोल तपासाचे आश्वासन दिले आहे.
या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर शासनाच्या वतीने कडक कारवाई केली जाईल आणि सर्व गुन्हेगारांना गजाआड केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर यांना राज्यातील आजवरच्या सर्वाधिक अकार्यक्षम अध्यक्ष ठरवत,
राजीनामा देऊनही त्यांचा माज उतरलेला नाही, अशी जळजळीत टीका केली. आपण स्वेच्छेने आणि वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे. यावरून, त्यांनी महिलांवर आणि पत्रकारांवर जो दबाव आणला आणि पोलिसांत तक्रार होऊ नये म्हणून जे उद्योग केले,
त्याबद्दल त्यांना कोणतीही चूक किंवा खेद वाटत नसल्याचे स्पष्ट होते, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच, चाकणकर हा केवळ एक छोटा मासा असून, या गंभीर आरोप असलेल्या अत्याचारी बाबाला राजाश्रय देणारे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी फोन करणारे अन्य मंत्री व नेते कोण होते? या सर्वांचीच सखोल चौकशी होऊन कडक कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या राजीनामा सत्रावर सडकून टीका केली आहे. जर त्यांना खरोखरच स्वेच्छेने राजीनामा द्यायचा होता, तर एक वर्षापूर्वी जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आले, तेव्हाच किंवा किमान तीन दिवसांपूर्वी तरी का दिला नाही?
असा बोचरा सवाल करत, त्यांनी हा राजीनामा नसून थेट हकालपट्टी असल्याचे म्हटले आहे.चाकणकर यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपले पद वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड केली. आता केवळ राजीनाम्याची मलमपट्टी न करता, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणे जास्त गरजेचे असल्याचे अंधारे यांनी ठणकावून सांगितले आहे.
