राँकेलचा पुरवठा सुरू करणार; मंत्री छगन भुजबळांची विधानपरिषदेत मोठी घोषणा
1 min read
मुंबई दि.१७:- मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचला आहे. एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सी बाहेर सामान्य ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. तर, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर न मिळाल्यानं हॉटेल्सला टाळं लागलं आहे.
राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी एलपीजी तुटवड्याच्या मुद्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत एलपीजीच्या मुद्यावर निवेदन सादर करत भूमिका मांडली.
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून, राज्यातील गॅस पुरवठा आणि टंचाईबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेत महत्त्वपूर्ण निवेदन दिले. नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
एलपीजीचा विषय हा केंद्र सरकारचा आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, एलपीजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. रांगा लावणे, काळाबाजार होणे यावर लक्ष आहे. अधिकार असलेल्या समित्यांची स्थापन करण्यात आली आहे.आतापर्यंत कारवाीत 1208 गॅस सिलेंडर आणि 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गॅस सिलेंडरची किंमत एका महिन्यात वाढली आहे. मात्र, एलपीजी उत्पादनही वाढल्याची माहिती छगन भुजबळ यांनी सभागृहात दिली.
यावेळी छगन भुजबळ यांनी केरोसिनच्या वापराबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आपल्याकडे राज्यात केरोसिनचा भरपूर साठा आहे.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही, असे निर्देश मध्यंतरी न्यायालयाने दिले होते. मात्र, आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करण्यासंदर्भात न्यायालयाला कळवले आहे. त्यानुसार केरोसिन डिलर्सही केरोसिन देऊ शकतात.
मात्र,मध्यंतरी आपण केरोसिन पूर्णपणे बंद केल्याने केरोसिन डिलर्सची साखळी तुटली होती. त्यामुळे बीपीसीएल,एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांच्या पंपांवर केरोसिन उपलब्ध करुन देऊ. जेणेकरुन केरोसिनमध्ये भेसळ होणार नाही.
आम्ही केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहोत.एलपीजी आणि पेट्रोलियम पदार्थ मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रश्न हळूहळू सुटेल, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
