पांढऱ्या चुन्याच्या खुणा आणि शेकडो कबरी, इराणमधील हा फोटो पाहून जग हादरले
1 min read
इराण दि.४:-अमेरिका आणि इस्राइलकडून होत असलेल्या भीषण हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याच्या बातम्या येत असतानाच दक्षिण इराणमधून समोर आलेल्या एका फोटोमुळे संपूर्ण जग हादरलं आहे.
येथे एका खुल्या मैदानामध्ये एका पाठोपाठ एक अशा शेकडो नव्या कबरी खोदण्यात येत असून, प्रत्येक कबरीवर पांढऱ्या चुन्याद्वारे खुणा करण्यात आल्या आहेत. तसेच जवळच उभे असलेले लोक शोकाकूल भावनेतून जवळच्या व्यक्तींना अखेरचा निरोप देण्याची तयारी करत आहेत.
हा हृदयद्रावक फोटो इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघाची यांनी समाज माध्यमांवर शेअर केला आहे.अराधाची यांनी सांगितले की, या कबरी एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या विद्यार्थिनींच्या आहेत. ही निरागस मुलांच्या हत्येची भयावह खूण आहे. गाझापासून मिनाबपर्यंत निर्दोषांचं रक्त सांडलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
इराणने केलेल्या दाव्यानुसार हा हल्ला अमेरिका आणि इस्राइल यांनी केलेल्या कारवाईदरम्यान झाला आहे. या कारवाईदरम्यान मिनाबमधील एका शाळेला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात १६५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. फोटोमध्ये दिसत असलेली कबरींची रांग हे या दुर्घटनेची कहाणी आहे, असा संताप इराणने व्यक्त केला आहे.
तर या मुलींचे मृतदेह मोठ्या प्रमाणावर छिन्नविछिन्न झालेले होते, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, शाळेवर झालेला हल्ला हा कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरवता येणार नाही, असे इराणने म्हटले आहे. मात्र इस्राइल सैन्याने या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.
तसेच इराणी अधिकारी दावा करत असल्याप्रमाणे आपल्याकडे अशा कुठल्याही हल्ल्याची माहिती नाही आहे, असे इस्राइलने म्हटले आहे. तर इराणमध्ये नागरिकांच्या झालेल्या हानीच्या वृत्ताची चौकशी सुरू असल्याचे अमेरिके कडून सांगण्यात आले आहे.
मात्र असं असलं तरी इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने सुरू केलेल्या संघर्षाचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. तसेच मिनाबमधील फोटोने हेच कटू सत्य समोर आणलं आहे.
