व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल येथे विज्ञान दिन उत्साहात संपन्न

1 min read

वडगाव कांदळी दि. २८:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित – व्ही. जे .इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. सी .व्ही .रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण परिणाम’ (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली. त्यांच्या या शोधासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे तसेच सर्व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विज्ञान दिनाचे महत्त्व शिक्षिका स्वप्नाली भोर यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रभावी शब्दांत मांडले. त्यांनी विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनात झालेल्या बदलांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.

यानंतर शाळेतील विद्यार्थिनी कुमारी माही देवळालीकर हिने विज्ञान दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. पुढे कुमार ऋग्वेद आतकरी , माही देवळालीकर, अर्णव भोर,मनस्वी पाचपुते, आराध्य गुंजाळ, सोहम बढे,आर्यन कुतळ व विघ्नेश बढे या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर करून विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट केल्या. त्यांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता व जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरली विद्यार्थ्यांची क्विझ स्पर्धा. रायगड हाऊस, प्रतापगड हाऊस, शिवनेरी हाऊस व सिंहगड हाऊस अशा गटांमध्ये विद्यार्थ्यांचे विभाजन करण्यात आले होते. विविध विज्ञान विषयक प्रश्नांमधून विद्यार्थ्यांची ज्ञानपातळी तपासण्यात आली. सकारात्मक स्पर्धात्मक वातावरणात विद्यार्थ्यांनी त्वरित उत्तरे देत उत्साहात सहभाग नोंदवला.

या स्पर्धेमध्ये प्रतापगड हाऊसने प्रथम क्रमांक पटकावला. या हाऊसमधील कुमार ऋग्वेद आतकरी, श्रीश घाडगे, कणक सोनवणे, कीर्ती गुंजाळ, तनुषा शेट्टी या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विजय संपादन केला. तसेच रायगड हाऊस ने रनर अप टीम म्हणून विजय मिळवला. स्पर्धेचे परीक्षण शाळेच्या समन्वयिका यांच्यासोबत शिक्षिका प्रतिभा हडवळे यांनी निष्पक्ष व अचूकपणे केले. विजेत्या संघाचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी मधील श्रावणी काळे व ईश्वरी घाडगे यांनी इंग्रजी भाषेतून अत्यंत आत्मविश्वासाने केले. शिक्षिका नीता मुळे यांनी कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी करून घेतली होती. मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या मार्गदर्शनामुळे व सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे विज्ञान दिनाचा हा कार्यक्रम नियोजनबद्ध, ज्ञानवर्धक व संस्मरणीय ठरला.

अशा प्रकारे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी, जिज्ञासा व प्रयोगशील वृत्ती वाढीस लागून ज्ञानाचा नवा प्रकाश पसरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!