श्रमदानातून शिवजन्मभूमी शिवनेरीचा सन्मान: श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव
1 min read
जुन्नर दि.२२:- श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट, माळवाडी-बोटा यांच्या वतीने २१ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले शिवनेरी येथे ‘गड संवर्धन व स्वच्छता अभियान’ उत्साहात पार पडले. फार्मसी व इंजिनिअरिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सुमारे ६५ स्वयंसेवकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी श्रमदान केले.
मोहिमेची सुरुवात शिवकुंज येथे जिजाऊ-शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवकांनी गडावरील मुख्य मार्ग, पायऱ्या व बुरुज परिसरातील प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्या, कागदी वेष्टने तसेच वाढलेली झाडाझुडपे हटवून परिसर स्वच्छ केला. गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
प्रा. तांदळे, प्रा. दातीर, प्रा. गिरी व प्रा. कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणानुसार सामाजिक मूल्यांचे शिक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगितले, तर सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी भविष्यात NSS उपक्रम अधिक व्यापक करण्याची ग्वाही दिली.
फार्मसीचे प्राचार्य डॉ. सागर सांगळे व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. केशव आरोटे व यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि जबाबदार सहभागाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ झाली असून परिसरातील नागरिकांनीही या प्रयत्नांचे स्वागत केले आहे.
