पवारांचा विमान अपघात; फडणवीस म्हणाले, मी अमित शाहांशी बोललोय, आपण सीबीआयमार्फत चौकशी करणार आहोत

1 min read

मुंबई दि.२३:- अजित पवार यांच्या विमानाचा खरोखर अपघात की घातपात? यावरून अनेक शंका, संशय आणि प्रश्नांचे वादळ उठले आहे. अपघातावरून अनेक आरोप प्रत्यारोपही झाले आहेत. पण या सगळ्याचा उलगडा ज्या ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आशा होती त्या ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.यावरून रोहित पवार यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच सुनेत्रा पवार यांच्यासहित राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अपघाताच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याच संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांसह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांना अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अपघाताची चौकशी सुरू असल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.अजित पवार यांचा दुर्दैवी अपघात झाला. सगळ्याच लोकांना धक्का बसला आहे, अनेक जण दु:खी आहेत. त्यांच्या कुटुंबापेक्षा अधिक दु:ख कुणाला असू शकत नाही. त्यांच्या अपघाताच्या अनुषंगाने डीजीसीएकडून चौकशी सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशा आशयाचे पत्र मला भेटून दिले आहे. राज्यातील जनतेला अजित पवार यांच्या अपघाताचे सत्य समजलेच पाहिजे. हे लक्षात घेऊन मी देखील केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी बोललो आहे. त्यांच्या अपघाताची आपण सीबीआयमार्फत चौकशी करणार आहोत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. अजित पवार यांच्या फ्लाईटच्या रेकॉर्डरसंबंधीचा डेटा डाऊनलोड केला आहे. वाईस रेकॉर्डबाबत भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे डेटा उपलब्ध होणार नाही, असे अजिबातच नाही. जे तसे दावे करीत आहेत,त्यांनी चौकशी यंत्रणांसमोर जाऊन तसे पुरावे द्यावेत, असा टोलाही त्यांनी लगावला.सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!