वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीत ‘शिवविचार’ व्याख्यान संपन्न
1 min read
वाकड दि.२१:- वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीमध्ये नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासावर आधारित विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या म्हणून सुचेता जयश्री विजयकुमार भिसे यांनी ‘शिवविचार: आजच्या काळाची गरज’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या ओघवत्या आणि पहाडी आवाजातील शैलीत बोलताना सुचेता भिसे यांनी शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यापासून ते गड-किल्ल्यांच्या संवर्धनापर्यंतच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, “महाराजांचे विचार केवळ पुस्तकात मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि आचरणात आणणे
हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. विशेषतः तरुण पिढीने शिवरायांचा स्वाभिमान आणि शिस्त अंगी बाणवणे आवश्यक आहे.”याप्रसंगी त्यांनी ‘शिवसेवक प्रतिष्ठान’च्या वतीने सुरू असलेल्या दुर्ग संवर्धन आणि ऐतिहासिक जनजागृतीच्या कार्याची माहितीही दिली. व्याख्यानादरम्यान उपस्थित श्रोत्यांनी शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.
कार्यक्रमाला पार्क स्ट्रीट सोसायटीचे पदाधिकारी, महिला मंडळ आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे व्याख्यात्या सुचेता भिसे यांचा यथोचित साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
