मातोश्री शैक्षणिक संस्थेला बस थांब्याची मंजुरी; संस्थेचे सचिव किरण आहेर यांनी मानले प्रशासनाचे आभार

1 min read

पारनेर दि.१८:-अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर ते कर्जुले हर्या या दरम्यान असलेल्या मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठाण(इंजिनीअरिंग,फार्मसी, मेडिकल व हॉस्पिटल) येथे आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस थांबा उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे संस्थेतील हजारो विद्यार्थी, कर्मचारी तसेच परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठाणच्या वतीने अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर संस्थेच्या ठिकाणी बस थांबा देण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी विचारात घेऊन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन अहिल्यानगर यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मातोश्री संस्थेचे सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांनी स्वागत केले असून प्रशासनाचे आभार मानले आहे.या पत्रानुसार, अहिल्यानगर विभागातील सर्व बस चालक व वाहक यांना मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठाण येथे थांबवून प्रवाशी व विद्यार्थी चढ-उतार करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक (पारनेर आगार) यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या थांब्याचे दोन फलक (बस स्टॉप बोर्ड) तयार करून विभागीय भांडार अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे फलक नंतर पारनेर आगार व्यवस्थापकांकडे पाठवले जातील आणि ते संबंधित ठिकाणी लावले जातील. याशिवाय, तारकपुर, पाथर्डी, जामखेड, पारनेर आदी आगारांतील अहिल्यानगर-कल्याण मार्गावरील सर्व बस चालक-वाहक यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्याचे आदेश आहेत. स्थानक प्रमुख (माळीवाडा/तारकपुर) यांनाही याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.या निर्णयामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रवास सोपा होईल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी जे महामार्गा वरून येत-जातात, त्यांना आता बस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. यापूर्वी अनेकदा बस थांबत नसल्याच्या तक्रारी होत होत्या. हा थांबा ‘विनंती थांबा’ (रिक्वेस्ट स्टॉप) स्वरूपाचा असून, प्रवाशांनी हात दाखवल्यास बस थांबेल.मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठाण टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्या गावाजवळील प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. येथे अभियांत्रिकी, फार्मसी, वैद्यकीय शिक्षणासह हॉस्पिटल सुविधा उपलब्ध आहेत. परिणामी, परिसरातील शैक्षणिक व आरोग्य सेवांना चालना मिळाली आहे. हा बस थांबा मंजूर झाल्याने संस्थेच्या विस्तारासोबतच स्थानिक विकासालाही हातभार लागणार आहे.प्रतिक्रिया
“अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील आमच्या संस्थेस बस थांब्याची मंजुरी मिळणे हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. यामुळे हजारो विद्यार्थी, कर्मचारी आणि परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सोपा होईल. राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मनापासून आभार! हा निर्णय ग्रामीण भागातील शिक्षण आणि विकासाला नवी गती देणारा ठरेल.

किरण आहेर (सचिव, मातोश्री शैक्षणिक संस्था)

चौकट :

प्रशासनाचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय..

प्रशासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठाण येथे बस थांबा मिळाल्याने ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा प्रवास सुरळीत होईल. यामुळे शिक्षणाची उपलब्धता वाढेल आणि स्थानिक विकासाला नवीन गती मिळेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!