अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणेंचा खळबळजनक दावा
1 min read
बीड दि.७:- दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. २८ जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवारांचे विमान कोसळले. या घटनेला १० दिवस झाले. या अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात की घातपात अशा शंका व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.पत्रकार परिषदेत खासदार सोनवणे यांनी अपघाताच्या वेळच्या सीसीटीव्ही फुटेजचा दाखला देत अनेक शंका मांडल्या.
विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच हवेत असताना स्फोट झाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. जर विमान जमिनीला धडकलेच नव्हते, तर स्फोट कसा झाला? असा सवाल त्यांनी केला.विमानाचा पुढचा भाग ज्या पद्धतीने छिन्न विच्छिन्न झाला आणि लोक बाहेर फेकले गेले, ते पाहता विमानात आधीच बॉम्ब ठेवला होता का,
याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तथापी, अपघाताच्या दिवशी सकाळी दादांना कोण भेटले आणि विमानाची सुरक्षा तपासणी कशी झाली, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की, ‘मी नकारात्मक विचार करणारा माणूस नाही, पण जे डोळ्यांना दिसतंय ते संशयास्पद आहे.
इंजिनमध्ये बिघाड झाला की कोणीतरी कट रचला? या सर्व प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने करून तो जनतेसमोर मांडला पाहिजे.अजित पवारांच्या विमानाचे दोन व्हिडिओ समोर आले असून विमानाचा दोन वेळा स्फोट झाला. मग विमानामध्ये बॉम्ब होता का? बॉम्बने विमान उडवले गेले का?’, असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
‘त्यावेळी नेमकं काय घडलं आहे? याची चौकशी झाली पाहिजे. घात की अपघात याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आले पाहिजेत. ब्लॅक बॉक्स सार्वजनिक केला पाहिजे.’, अशी मागणी त्यांनी केली. अजितदादा देवगिरीवरून किती वाजता निघाले
त्याचे सीसीटीव्ही फुटेज. एअरपोर्टवरून निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि विमानात कधी बसले यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. सुरुवातीला सहा लोकांचा आकडा सांगितला गेला. मग एक कुठे गेला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.
