मिरवणूक, वरात दारू सेवनामुळे बदनाम; विशाल विमल यांचे प्रतिपादन

1 min read

पिंपळगाव दि.२६:- पार्टी, मिरवणूक, वरात या समारंभात सर्रास दारूचे सेवन केले जाते. त्यामुळे हे समारंभ बदनाम झाले आहेत. व्यसन करण्याचे वय दिवसेंदिवस खाली येत असून पार्टी, मिरवणूक, वरात या समारंभातून मुले दारू पिण्यास शिकतात, असे प्रतिपादन विवेकवसा फाउंडेशनचे संघटक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांनी केले.श्रीराम विद्यालय पिंपळगाव (खडकी) येथे ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या विषयावर विशाल विमल यांचे व्याख्यान झाले. यावेळी मुख्याध्यापक दादासाहेब फापाळे, शालेय गुणवत्ता संवर्धन अभियानाचे परीक्षक दत्तात्रय भोर, ग्रामस्थ योगेश बारवकर, लिंबाजी पोखरकर आदी यावेळी उपस्थित होते.व्यसनाजन्य पदार्थांच्या पहिल्या सेवनापासूनच मेंदू या पदार्थांचा गुलाम होतो. त्यातून मग बाहेर पडणे अशक्य होते. या पदार्थांचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे युवा पिढीने व्यसनाजन्य पदार्थापासून चार हात लांबच राहिले पाहिजे. व्यसनाजन्य पदार्थातील रासायनिक घटकांचा मेंदूतील प्रक्रियेवर परिणाम होऊन त्याचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. मेंदूची हानी होते. ती हानी कोणत्याही औषधाने भरून येत नाही, असेही विशाल विमल म्हणाले.’विवेकवसा’ फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेसोबत काही उपक्रम राबवण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव टेमकर तर आभार बबन बांगर यांनी मानले.कामाच्या व्याख्यानांच्या निमित्ताने आपण असंख्य ठिकाणी फिरत असलो तरी आपल्याच शाळेत आपल्याला जेव्हा व्याख्यानासाठी बोलावले जाते तेव्हा ती आपल्यासाठी गौरवाची गोष्ट असते. आपल्या शाळेच्या शिक्षकांनी आपल्यावर दाखविलेला तो विश्वास असतो. हा विश्वास पुरस्काराच्या भावनेहून मला सर्वोच्च वाटतो असे विशाल विमल यांनी म्हटले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!