केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ४ दिग्गजांना पद्म पुरस्कार

1 min read

नवीदिल्ली दि.२६:- केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून एकूण ४५ दिग्गजांसाठी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ४ महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. या सर्व दिग्गजांना प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्काराची घोषणा झाली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांनादेखील पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्रीरंग देवबा लाड यांना पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांनादेखील पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहेत.

भिकल्या लाडक्या धिंडा कोण आहेत?

भिकल्या लाडक्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील वलवंडे गावचे रहिवासी आहेत. ते 89 वर्षीय आहेत. ते आदिवासी तारपा वादक आहेत. ते अतिशय उत्कृष्ट तारपावादन करतात. तसेच ते तारपाची निर्मिती देखील करतात. ते तरुणांना तारपावादन शिकवतात. तारपा हे बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाणारे पारंपरिक वाद्य आहे. ते जवळपास 9 ते 10 फूट लांबीचे असते. भिकल्या लाडक्या धिंडा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी व्यथित केलं. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव आता सर्वोच्च पुरस्काराने करण्यात येणार आहे.

रघुवीर खेडकर कोण आहेत?

रघुवीर खेडकर हे प्रसिद्ध तमाशा कलावंत आहेत. ते गेल्या 40 ते 45 वर्षांपासून तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. तमाशा संस्कृती टिकवणं आणि ती राज्याबाहेर नेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. रघुवीर खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. त्यांना त्यांच्या योगदानासाठी तमाशा महर्षी म्हणून देखील ओळखलं जातं. रघुवीर खेडकर हे मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत.प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे ते पुत्र आहेत. रंगभूमीची सेवा करण्याचा वारसा रघुवीर खेडकर यांना आईपासून मिळाला. हा वारसा त्यांनी समर्थपणे जपला देखील आहे. त्यांच्या नेतृत्वातील तमाशा मंडळ रघुवीर खेडकर तमाशा मंडळ हे लोकप्रिय आहे.

श्रीरंग देवबा लाड कोण आहेत?

परभणी जिल्ह्यातील माळसोन्नाचे श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कापूस तंत्रज्ञानाचे जनक मानले जातात. तसेच शेतकरी-केंद्रीत कृषी नवप्रवर्तनाचे प्रेरक, स्वदेशी पशुधन संवर्धनाचे आदर्श मार्गदर्शक, ग्रामीण विकास, शाश्वत शेती यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांचं सामाजिक कार्यदेखील तितकेच मोठं देखील आहे. त्यांना याआधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासोबतच अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

डॉ. आर्मिडा फर्नांडीस कोण आहेत?

डॉ. आर्मिडा फर्नांडीस यांचं देखील समाजासाठी मोठं योगदान आहे. आर्मिडा या मुंबईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ज्ञ आहेत. भारतीय नवजात शिशु आरोग्य सेवेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी 1989 मध्ये आशिया खंडातील पहिली दूध बँकेची स्थापना केली होती. नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना यश देखील आलं. त्यांनी मुंबईतील शीव रुग्णालयात 25 वर्षांपेक्षा जास्त काळ बालरोग विभाग प्रमुख आणि डीन म्हणून काम केले आहे. यासोबतच 2000 पेक्षा जास्त परिचारिका आणि डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!