मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता व अभिमान:- एकनाथ शिंदे
1 min read
सातारा दि.५:- मराठी भाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा, अस्मिता, अभिमान आहे. ही भाषा संपली तर आपले अस्तित्व संपेल याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे.
तिचे व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवत मराठीचे वैभव,दरारा आणि मराठीचा दिमाख कायम ठेवणे हे आपले केवळ कर्तव्य नसून ती अत्यंत पवित्र अशी जबाबदारी आहे. या साहित्य संमेलनाला शासनाने 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
यापुढेही अशा साहित्य संमेलनांना निधी कमी पडणार नाही, हे पाहणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचा समारोप उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी होते. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक
बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, आमदार महेश शिंदे, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते.
