ऊसाला ४३ कांड्या; पारगावच्या शेतकऱ्याला विक्रमी उत्पादन; चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली भेट
1 min read
बेल्हे दि.२८:- पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील प्रगतशिल ऊस उत्पादक शेतकरी विक्रम तट्टू यांनी आपल्या ३ एकर क्षेत्रात ८६०३२ जातीच्या आडसाली ऊसशेतीत गेले १६ महिने मेहनत घेत चांगल्या पिकवलेल्या ऊस शेतीची पाहणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केली.
या प्रसंगी विलास तट्टू, कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सचिन पाटील, ऊस विकास विभाग व पारगाव तर्फे आळे गट कार्यालयातील गटप्रमुख, कर्मचारी व विक्रम तट्टू यांचे कौटुंबिक सदस्य उपस्थित होते.जुलै २०२४ मध्ये तट्टू यांनी ऊसाची लागवड केली. एकरी ८० मोळ्या उसाचे बियाणे त्यांनी लागवड केले.
घरच्या ऊसाचे बियाणे वापरल्याने खर्चही वाचला. साडेचार फुटाच्या सरी त्यांनी बनवल्या. एकेक फुटाचे अंतर ठेऊन दोन डोळ्याची लागवड केली. एकरी एक ट्रक शेणखत त्यांनी टाकले. कारखान्याच्या प्रयोगशाळेत तयार होणारी जीवाणू खते, रासायनिक खते, शेणखताचा वापर केला.
ड्रोनद्वारे फवारणी करून ऊस लागवड ते ऊस तोड दरम्यान केलेल्या योग्य नियोजनामुळे त्यांच्या एका ऊसाला सरासरी ४३ कांड्या आल्या असून विक्रमी उत्पादन घेण्यात ते यशश्वी झाले. खते,औषधे,मजुरी,मशागत असा एकरी ५० हजार रुपये त्यांना खर्च आला. एक एकर ऊसाची तोड सध्या पूर्ण झाली असून.
त्यात त्यांना १०१ टन उत्पादन निघाले. तीन एकरात त्यांना ३०० ते ३२५ टन उत्पादन निघेल अशी अपेक्षा असून यातून त्यांना अंदाजे दहा ते सव्वा दहा लाख रुपये उत्पादन निघेल अशी आशा आहे. एकरी ५० हजार रुपये उत्पादन खर्च वजा करता ८.५० लाख ते ९ लाख हजार रुपये नफा मिळेल अशी माहिती तट्टू यांनी दिली.
——–
प्रतिक्रिया
” विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम चालू झाल्यापासून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोड चालू असलेल्या विविध शेतकऱ्यांच्या प्लॉट्सना शेतकी विभागाच्या सहकाऱ्यांसमवेत भेटी देऊन हार्वेस्टर, ऊसतोड कामगारांकडून तोडणी व्यवस्थित होऊन ऊस सुरक्षित व वेळेत कारखान्यावर पोहोच होतोय का? तसेच शेतकऱ्यांच्या इतर अडचणी आम्ही संचालक मंडळ समजून घेत आहोत.”
सत्यशील शेरकर,
चेअरमन विघ्नहर सहकारी साखर कारखाना
———-
