भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार:- मंत्री बावनकुळे

1 min read

मुंबई दि.२४:- भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनस्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जमीन मोजणीसाठी आवश्यक अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना महसूल मंत्री बावनकुळे यांनी केल्या. भूमी अभिलेख विभागाकडील भू-करमापक पदाच्या वेतनश्रेणीबाबत केलेल्या मागणीबाबत विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळस्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी संवर्गात ज्या प्रमाणे प्रवास भत्ता दिला जातो त्या प्रमाणे प्रवास भत्ता देणेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.बैठकीत भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, आकृतीबंध, अनुकंपा भरती, सरळसेवा भरती, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि सेवाज्येष्ठता यादी याबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भात विभागाने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!