खासदार सुप्रिया सुळे, कंगना रणौत अन् महुआ मोईत्रा यांचा एकत्र डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

1 min read

नवी दिल्ली दि.९:- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एकत्र डान्स केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भाजपाचे खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्न समारंभातील असल्याचं सांगितलं जात आहे.महुआ मोईत्रा, सुप्रिया सुळे, कंगना रणौत यांचा याआधी नृत्याची तालीम करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावर सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता या तिन्ही खासदारांचा नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.व्हिडीओत नेमकं काय?
ओम शांती ओम या चित्रपटातील एका गाण्यावर खासदार सुप्रिया सुळे, खासदार कंगना रणौत आणि खासदार महुआ मोईत्रा या तिन्ही खासदार डान्स करताना दिसत आहेत. तसेच यावेळी नवीन जिंदाल हे देखील त्यासपीठाच्या मध्यभागी असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंगना रणौत यांनी नृत्याची तालीम करतानाचा एक फोटो देखील शेअर केला होता. त्यानंतर आता या तिन्ही खासदारांचा डान्स करताना व्हिडीओ समोर आला आहे.सुप्रिया सुळे, कंगना रणौत, महुआ मोईत्रांचा डान्स करतानाचा फोटोही झाला होता व्हायरल भाजपाचे खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती, तेव्हा या लग्नात खासदार नृत्य सादर करणार असून त्या नृत्याची तालीम करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो कंगना रणौत यानी पोस्ट केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले. नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमानिमित्त सराव करण्यात आला, असं त्यांनी सांगितलं होतं.सोशल मीडियावर झाली टीका कंगना रणौत यांनी शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही हँडल्सवरून या फोटोवर टीका करण्यात आली होती. डॉ. निमो यादव या हँडलवरून केलेल्या पोस्टला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. “अशाप्रकारे राजकारणी तुम्हाला मूर्ख बनवतात…”, अशा आशयाची पोस्ट या अकाऊंटवर शेअर करण्यात आली होती.या हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, सुप्रिया सुळे, महुआ मोईत्रा यांच्यासारखे बिगर भाजपाचे खासदार हे कंगना रणौत यांच्याबरोबर नृत्य करत आहेत. याच कंगना रणौत यांनी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं होतं. आणखी एका हँडलवरून या फोटोवर टीका करण्यात आली होती. अमॉक या हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा दुटप्पीपणाचा कळस आहे.नवीन जिंदाल कोण आहेत?
नवीन जिंदाल हे प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकारणी आहेत. २००४ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ साली पुन्हा त्यांनी विजय मिळवला. २०१४ साली त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. तर २०१९ साली काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नव्हते. २०२४ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा कुरुक्षेत्र लोकसभेतून ते संसदेवर गेले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!