पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम

1 min read

पुणे दि.४:- पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार पुणे विभागात २ लाख ७२ हजार ६१ पदवीधरांची तर ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.या २०२५ च्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादीनुसार पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ५४ हजार ८१० मतदार नोंदणी, सातारा-३५ हजार ८७९, सोलापूर- ३० हजार ४७२, कोल्हापूर- ८० हजार १८०, सांगली- ७० हजार ७२० अशी एकूण २ लाख ७२ हजार ६१ इतकी नोंदणी झाली आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी पुणे- ९ हजार ७७८, सातारा- ८ हजार ४९२, सोलापूर- ११ हजार १९८, कोल्हापूर- ८ हजार ६३१ व सांगली- ६ हजार १३४ अशी एकूण ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.२०२० मध्ये पदवीधर मतदार संघासाठी ४ लाख २० हजार ८९६ इतकी तर शिक्षक मतदारांची ७२ हजार १९० इतकी नोंदणी होती. गेल्या निवडणुकीपेक्षा यावर्षी आतापर्यंत कमी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीची प्रसिद्धी व जागृती करुन जास्तीत जास्त पात्र मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम:या कार्यक्रमांतर्गत १८ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या पदनिर्देशित अधिकारी किंवा संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती दाखल करता येतील. नवीन नाव नोंदणीचा दावा दाखल करण्यासाठी पदवीधरांना नमुना क्रमांक १८ व शिक्षकांना नमुना क्रमांक १९ द्वारे याच कालावधीत दावा दाखल करता येईल. प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ व यादीतील नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ दाखल करता येईल.दावे व हरकतींचा कालावधी संपल्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाईची कार्यवाही करण्यात येईल. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या यादीची अंतिम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२६ रोजी केली जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!