‘रिलस्टार’ तरुणी निघाली सराईत चोर;स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

1 min read

अहिल्यानगर दि.४:- रीलस्टार असलेली व समाज माध्यमावर ५० हजारांहून अधिक ‘फॉलोवर्स’ असलेली तरुणी प्रत्यक्षात सराईत चोर असल्याचे अहिल्यानगर पोलीसांच्या तपासात आढळले आहे. ती व तिचा प्रियकर अशा दोघा ‘बंटी-बबली’च्या जोडीला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या दोघांवर मिळून तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ९ लाख ३५ हजार ३२० रुपये किंमतीचे चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत.एसटी बसमधील सहप्रवासी महिलेला लुटण्याचे काम ही ‘रीलस्टार’ तरूणी करत असल्याचे व तिच्या प्रियाकरावर तर दरोड्यासारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली. ‌कोमल नागनाथ काळे (वय १९, पाथर्डी रस्ता, भीमसेननगर, शेवगाव, अहिल्यानगर) व तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी (वय‌ २५, मूळ रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी, अहिल्यानगर, सध्या रा. शंकरनगर, शेवगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या हवाली केले आहे. गेल्या १९ नोव्हेंबरला दुपारी अलका मुकुंद पालवे (वय ३९, देवराई, पाथर्डी, अहिल्यानगर) ह्या पाथर्डी ते कल्याण या एसटी बसने पाथर्डी येथून प्रवास करत असताना अनोळखी महिलेने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली. यासंदर्भात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यात बसमध्ये झालेल्या चोरी व बसस्थानक परिसरातील चोऱ्या उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक कबाडी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार सुरेश माळी, विष्णू भागवत, फुरकान शेख, दीपक काटकर, भीमराज खडसे, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रकाश माडगे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, भगवानराव थोरात, जालिंदर माने, महिला पोलीस वंदना मोडवे, भाग्यश्री भिटे, सारिका दरेकर, ज्योती शिंदे, सोनाली भागवत यांचे पथक सूचना देऊन नियुक्त केले होते.पथकाने व्यावसायिक कौशल्याचा वापर करत गुन्ह्यातील महिला आरोपी ही पाथर्डी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती काढली. सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आले. कोमल नागनाथ काळे असे तिचे नाव. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधरी याच्याकडे चोरीचे दागिने दिल्याची माहिती दिली. पथकाने सुजित चौधरी याचा शोध घेतला असता तो शेवगावमधील शंकरनगर येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. त्याला तेथे जाऊन अटक करण्यात आली.कोमलने चोरी केलेल्या रोख रकमेतून १ लाख ७० हजार रुपयांचा आयफोन १७ प्रो मॅक्स मोबाईल, १५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल विकत घेतला होता तसेच ७ लाख ४८ हजार रुपये किमतीचे ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सुरेंद्र चौधरीकडे दिले होते. हे दागिने मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३५ हजार २४० रुपये किंमतीचा आवाज पोलिसांनी दोघांकडून जप्त केला.पोलीस तपासात या ‘बंटी आणि बबली’ जोडीने अमरापूर ते शेवगाव बसमध्ये, पाथर्डी ते भगूर बसमधून सहप्रवासी महिलेकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. कोमल काळे हिच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात २, सुपा ठाण्यात १, शिरूर कासार गेवराई या दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर सुजित चौधरी याच्याविरोधात बीड व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व इतर ८ गुन्हे दाखल असल्याचे तपासात पोलिसांना आढळले. बसमध्ये प्रवास करताना कोणत्याही अनोळखी, भोळ्या भाबड्या चेहऱ्याच्या महिला व व्यक्तीवर विश्वास ठेवू नये व आपल्या मौल्यवान सामानाची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक कबाडी यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!