शाळा वेळ बदली संबंधी गजानन पाटील यांचे गटशिक्षणाधिकारी यांना आदेश

1 min read

जांबुत दि.२४:- शिरूर-आंबेगाव-खेड जुन्नर या अति संवेदनशिल बिबटप्रवण क्षेत्रातील बिबट्याच्या मानवी हल्ला प्रकरणी वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल करून सदरची वेळ आता सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० अशी निश्चित करण्यात आली आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून बिबट्याप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळेतील हे बदल संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समिती तथा शाळा समितीची मंजूरी घेवून करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहेत.पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जुन्नर बिबट प्रवण क्षेत्रातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बिबट प्रवण क्षेत्रात असलेल्या शाळेतील विद्यार्थी सुरक्षितता संबंधित उपाययोजना करण्याबाबत संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना परिपत्रक काढून शाळांना सुचित करण्याचे निर्देश दिले आहेत.पुणे जिल्हयात सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा जरी एक किलोमीटर व उच्च प्राथमिक शिक्षणाची सुविधा तीन किलोमीटर अंतराच्या आत उपलब्ध असली तरी बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत येतात व शाळा सुटल्यावर घरी जातात रस्तयांच्या कडेने बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र,ऊस क्षेत्र,जंगल क्षेत्र,डोंगराळ क्षेत्र अनेक ठिकाणी आहेत. सध्या ऊसतोडीमुळे उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबट्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच सद्यस्थितीत हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बिबटयांच्या हल्लयामुळे एकही विद्यार्थी क्षतीग्रस्त होऊ नये, विद्यार्थी संध्याकाळी अंधरापूर्वी तसेच रस्त्यावर रहदारी असतानाच घरी पोहचणे आवश्यक आहे. यासाठी बिबट प्रवण आपत्ती क्षेत्रातील शाळांच्या वेळेत सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० असा बदल शाळा व्यवस्थापन समिती / शाळा समितीची मंजूरी घेवून करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.सर्व बिबट प्रणव आपत्ती क्षेत्रातील शाळेच्या तसेच याव्यतिरिक्त बिबट्याचा वावर असणा-या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या निर्दशनास आणून दयावी. तसेच पुणे जिल्हयातील सर्वच शाळास्तरावर सकाळच्या परिपाठात सुरक्षिततेबाबत सर्व विद्यार्थ्याचे तात्काळ उद्बोधन करण्यात यावे. शाळास्तरावर पालक मेळावे घेऊन शाळेत येताना व शाळा सुटताना पाल्यांना स्वतः घेऊन जाणेबाबत पालकांना अवगत करावे. प्रत्येक विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचल्याची वर्गशिक्षकांनी खात्री करणे आवश्यक आहे. तसेच शालेय स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या सभा दरमहा घेवून विदयार्थी सुरक्षेच्या अधिकच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.असे निर्देश बिबट प्रवण क्षेत्रातील गटशिक्षणाधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!