गावठी कट्टा बाळगल्याने आष्टीच्या सुनील चव्हाणला अटक
1 min read
नगर दि.२१:- गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुनील मच्छिंद्र चव्हाण (वय ४०, रा. आष्टी. जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा ६२ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गावठी कट्टा बाळगणाऱ्यावर कोतवाली पोलिसांची महिनाभरातील ही दुसरी कारवाई आहे.शहरातील कै. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या घराजवळील आनंदधाम गेट येथे एक इसम संशयितरित्या मोटरसायकलवर थांबलेला असून त्याच्या कंबरेला गावठी कट्टा असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.
या माहितीवरून गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कंबरेला एक गावठी कट्टा व मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सोमनाथ आसाराम राऊत यांच्या फिर्यादीवरून सुनील चव्हाण याच्यावर बेकायदेशीर शस्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.