जुन्नर तालुक्यातील शाळांमधील सातशे बारा विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप
1 min read
बोरी दि.६:- सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या सेवाभावी संस्थेच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सतरा शाळांमधील सर्व सातशे बारा विद्यार्थ्यांना स्कूल किटचे नुकतेच बोरी खुर्द येथे वाटप करण्यात आले अशी माहिती जुन्नर तालुका समन्वयक संपत बांगर यांनी दिली.
याप्रसंगी जुन्नर पंचायत समीतचे गट शिक्षण अधिकारी अशोक लांडे,खेड पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे,सेवा सहयोग अहिल्यानगर समन्वयक भाऊसाहेब कासार,बोरी खुर्दच्या सरपंच कल्पना काळे, उपसरपंच महेश काळे,ग्रामपंचायत सदस्य पुष्पा बांगर, गोरक्ष शेटे,पोलिस पाटील अक्षय काळे,
सर्वोन्नती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे,सचिव नरहरी शिंदे, उपाध्यक्ष लक्ष्मण काळे,संभाजी काळे, पक्षीमित्र कुचिक, डोंगरे मामा,केंद्रप्रमुख शंकर सोनवणे,साहेबराव मांडवे, वनिता हांडे,ललित गाढवे, शमशुद्दीन पटेल,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई ही सेवाभावी संस्था शिक्षण क्षेत्रात काम करते.दरवर्षी शाळा सुरू झाली की पालकांची मुलांचे शालेय गणवेश,दफ्तर,पाठ्यपुस्तके,वह्या आणि इतर शैक्षणीक साहित्य खरेदीसाठी खूप आर्थिक ओढाताण होते. पालकांची हीच अडचण ओळखून समाजातील गरीब,गरजू विद्यार्थ्यांना साहित्य रुपात संस्था मदत करते.
सातशे बारा विद्यार्थ्यांना या संस्थेच्या वतीने नुकतेच अतिशय उच्च प्रतीचे स्कूल किटचे वाटप करण्यात आले या किट मध्ये दफ्तर,वह्यांचा संच,कंपास बॉक्स,आलेख वही, चित्रकला वही व इतर साहित्य देण्यात आले.संपत बांगर यांनी प्रास्ताविकातून सेवा सहयोग या संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली.
सेवा सहयोगचे भाऊसाहेब कासार यांनी संस्था शिक्षण क्षेत्रात करत असलेल्या स्कूल किट वाटप,शाळांसाठी भौतिक सुविधा व इतर कामांबद्दल माहिती दिली.विस्तार अधिकारी अनिता शिंदे यांनी भाऊसाहेब कासार व संपत बांगर यांनी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक केले.
गटशिक्षणअधिकारी अशोक लांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,दानशूर व्यक्ती,काही स्वयंसेवी संस्था हे नेहमीच शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात.विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मदतीचा चांगला वापर करून आपली गुणवत्ता वाढवावी,
शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.शिक्षण विभाग चांगल्या कामासाठी नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन त्यांनी दिले. समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहचते याचे विशेष समाधान वाटते अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
दिवाळी सुटीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी स्कूल किट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.मिळालेल्या या मदतीचा आम्ही नक्कीच उपयोग करून आयुष्यात मोठे होऊन असेच काम करू असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दौलत बांगर यांनी तर आभार मुख्याध्यापक भाऊसाहेब गवळी यांनी मानले.
