राज्याच्या डाळी आणि तेलबियांच्या खरेदी योजनांना खर्चासह मंजुरी
1 min read
नवी दिल्ली दि.२८:-केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये डाळी आणि तेलबियांच्या खरेदी योजनांना ₹ १५,०९५.८३ कोटी रुपयांच्या विक्रमी खर्चासह मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे संबंधित राज्यांतील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित होणार असून त्यांना त्यांच्या पिकाला योग्य किमान आधारभूत मूल्य (MSP) मिळण्यास मदत होणार आहे.केंद्रीय मंत्री चौहान यांनी संबधित राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत ई-बैठक घेऊन ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) अंतर्गत या योजनांना अंतिम रूप दिले.
या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मूल्य समर्थन योजने (PSS) अंतर्गत करण्यात येणारी खरेदी विक्रमी स्तरावर आहे.महाराष्ट्रात १८,५०,७०० मेट्रिक टन सोयाबीन, ३,२५,६८० मेट्रिक टन उडीद आणि ३३,००० मेट्रिक टन मूग आदींची खरेदी मंजूर करण्यात आली आहे.
या खरेदीसाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ₹९,८६०.५३ कोटी, ₹२,५४०.३० कोटी आणि ₹२८९.३४ कोटी इतका असून ही महाराष्ट्रासाठी मंजूर झालेली सर्वात मोठी खरेदी योजना आहे.
