सहकार तत्वावरील परिसंस्था येत्या पाच वर्षात निर्माण करणार:- केंद्रीयमंत्री अमित शाह
1 min read
मुंबई दि.२८:- सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, साखर उद्योगांनी देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात समृद्धी आणण्याचे काम केले. त्याप्रमाणे देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही समृद्धी आणण्यासाठी सहकार तत्वावरील परिसंस्था (ईको सिस्टीम) येत्या पाच वर्षात निर्माण करण्यात येईल,
असे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण व उद्घाटनप्रसंगी सांगितले.आज दोन नौका देत असलो तरी पुढील काळात ही योजना मच्छिमारांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात भारताच्या मत्स्य संपतीच्या क्षमतेत वाढ होणार असून.
त्याचा लाभ मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मच्छिमारांना थेट होणार आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत सध्या राज्यातील सहकारी संस्थांना १४ नौका देण्यात येत असून, पुढील पाच वर्षांत किमान २०० नौका समुद्रात उतरवण्याचे लक्ष्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.
या नौका २५ दिवस खोल समुद्रात राहून २० टनांपर्यंत मासे पकडू शकतील.या नौकांमधून मासे गोळा करून किनाऱ्यावर नेण्यासाठी एक मोठे जहाजही उपलब्ध करण्यात येईल. या नौकांच्या माध्यमातून होणारा नफा हा थेट मच्छिमारांपर्यंत पोहोचणार असून त्यातून त्यांची आर्थिक समृद्धी होईल.
आपल्या किनारपट्टीवर अपार क्षमता असून याचा लाभ आपल्या जास्तीत जास्त मच्छीमारांपर्यंत पोहोचवणे हेच केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे, असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी सांगितले.
