शहापूर येथील सराफाला कऱ्हाडात ३५ लाखांना लुटले
1 min read
कऱ्हाड दि.२७:- सोने खरेदीच्या बहाण्याने बेळगावच्या सराफाला येथे बोलावून मारहाण करून त्याला ३५ लाखांना लुटल्याची घटना घडली. येथील मंगळवार पेठेतील एका पडक्या वाड्यात १३ ऑगस्टला घडलेली घटना काल उघडकीस आली.याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यातील दोघांना अटक झाली आहे.
प्रवीण प्रभाकर आणवेकर (वय ४७, रा. कीर्तनकार अपार्टमेंट, भोज गल्ली, शहापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली. मुरलीधर ऊर्फ अनिकेत शेवाळे (रा. कऱ्हाड) याच्यासह कोल्हापूरच्या एकाला पोलिसांनी अटक केली. अन्य एकजण पसार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यात शहापूर येथील सराफ व्यावसायिक प्रवीण आनवेकर व त्यांच्या तेथीलच साईराज यांची ओळख होती. काही महिन्यांपूर्वी साईराजने येथील मुरलीधर ऊर्फ अनिकेत शेवाळे याच्याकडे सोने असून, तो कमी पैशात सोने विकत देत असल्याचे प्रवीण आनवेकर यांना सांगितले.
साईराजच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आनवेकर यांनी मुरलीधर शेवाळे याच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्याने ३५ लाख रुपयांत अर्धा किलो सोने देतो, असे सांगितले.व्यवहार ठरल्यानंतर आनवेकर ३५ लाख रुपये घेऊन १३ ऑगस्टला दुपारी कऱ्हाडला आले. त्यानंतर संशयित त्यांना घेऊन
शहरातील मंगळवार पेठेतील निरंजन कुलकर्णी यांच्या पडक्या वाड्यात गेले. तेथे संशयितांनी आनवेकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील ३५ लाखांची राेकड असणारी बॅग हिसकावून तेथून पोबारा केला.
