नव्या बोरी – खोडद गटात चुरस वाढली; नव्या जिल्हा परिषद गटात इच्छुकांची संख्या वाढली
1 min read
आणे दि.२६:- बोरी – खोडद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जिल्हा परिषदेसाठी आरक्षित असून पंचायत समितीला बोरी बुद्रुक गणामध्ये सर्वसाधारण तर खोडद गणात नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला साठी आरक्षित आहे. हा जिल्हा परिषद गट तालुक्यामध्ये नव्याने तयार करण्यात आला असून.
या गटात अगोदरच्या आजूबाजूच्या गटातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे.या गटात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या असल्याने चुरस वाढली आहे.जिल्हा परिषद गटासाठी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता संदीपान पवार,
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे यांच्या पत्नी व विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या माजी संचालिका व निमगाव सावा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या संगीता भास्कर गाडगे, वडगाव कांदळीच्या आदर्श सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते, बोरी खुर्द गावच्या सरपंच कल्पना वैभव काळे,
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे, बोरी गावच्या माजी सरपंच पुष्पा अमोल कोरडे, बोरी गावच्या विद्यमान सदस्या कोमल युवराज कोरडे, वडगाव कांदळीच्या माजी सरपंच माधुरी सचिन निलख इच्छुक आहेत.
तर पंचायत समितीसाठी पारगावचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण, वडगाव कांदळीचे माजी सरपंच रामदास पवार यांच्या पत्नी मनीषा पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे जुन्नर तालुका अध्यक्ष रोहित राजेंद्र नरवडे, प्रगती सुदर्शन बडे इच्छुक आहेत. एका एका पक्षाचे दोन ते तीन इच्छुक उमेदवार आहेत.
सध्या इच्छुकांची संख्या जरी वाढली असली तरी पक्षाचे तिकीट कोणाला मिळतंय याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. युती आघाडी धर्म जपला जाणार का? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार आपल्या पंचायत समिती गणातून कोण निवडणूक लढेल हे सध्या काही जणांनी गुपित ठेवला आहे.
सध्या तरी या गटामध्ये निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ऐनवेळी कोण पक्ष प्रवेश करणार व तिकिटासाठी कोण आपल्या पक्षाला रामराम करणार याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर उमेदवारांमध्ये काही निष्ठावान असल्याचेही दिसून येत आहे.
पक्षावर निष्ठा असणारांनाच तिकीट मिळेल अशी ही चर्चा रंगली आहे. हा नवीन जिल्हा परिषद गट कोण काबीज करणार याकडे लक्ष लागला आहे.
————
चौकट
या गटामध्ये बोरी बुद्रुक, जाधववाडी, निमगाव सावा, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, पिंपरी कावळ, खोडद, कांदळी, वडगाव कांदळी, बोरी खुर्द, येडगाव या गावांचा समावेश आहे. मागच्या निवडणुकीमध्ये येडगाव हे नारायणगाव – वारूळ वाडी गटामध्ये होते.
————–
गटातील समस्या
या गटात बिबट्यांची मोठी समस्या आहे. शेतीमालाला बाजार भाव, वाड्या वस्त्यांचे रस्ते करणे, आरोग्याच्या समस्या या गटामध्ये आहेत.
